पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना हरकतींवर सुनावणी : महसुली भाग व गावठाण एकसंध न ठेवल्यास न्यायालयात जाऊ

आज पुण्यातील बालगंधर्व याठिकाणी सुनावणीच्या वेळी अनेक नागरिक व इच्छुकांनी गर्दी केली होती. या प्रभाग रचनेवर लोहगावकरांनी तब्बल ८१९ हरकती घेतल्या होत्या या प्रभाग रचनेची सुनावणी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.
कडेकोट बंदोबस्तात सुनावणी झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत लोकशाहीची गळा तर घोटत नाही ना अशी विचारणा केली. त्यातच प्रत्येकाला वेळ दिला नसल्याने हरकत कर्त्यानी जाहीर नाराजी व्यक्त केली. दरम्यान लोहगावचा महसुली भाग जर एकसंघ ठेवला नाही तर प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा लोहगावमधील सुनील खांदवे- मास्तर, दिपक (कमिटी) खांदवे यांनी सांगितले.
सकाळी १० वाजता कडेकोट बंदोबस्तामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ६ प्रभागाची सुनावणी सुरू झाली. सुनावणी साठी ज्यांनी हरकती घेतल्या त्यांनाच तेही ओळख पत्र पाहून प्रवेश दिला जात होता. बाकीच्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रभाग एक व दोनची सुनावणी झाल्या नंतर प्रभाग तीन लोहगाव- विमाननगर प्रभागाची सुनावणी सुरू झाली. एकाच विषयाच्या हरकती घेतलेल्यानपैकी एक ते दोन जणांना बोलविले जात होते. बाकीच्यांना बोलविले नाही. हरकतीचा विषय वेगळा असला तरी पुरेसा वेळ दिला नसल्याची खंत हरकत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.