इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला : पुण्यात मोठी दुर्घटना.
पुण्यात मावळमधील कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.

पुण्यात मावळमधील कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 20 ते २५ पर्यटक इंद्रायणी नदीत वाहून गेले असल्याची माहिती आहे. तर या घटनेत आतापर्यंत 5 ते 6 पर्यटक दगावल्याची भिती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफचे बचाव पथक स्थानिक पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी – चिंचवडसह पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या कुंडमळ्यावर आज रविवार म्हणजेच विकेंड असल्याने पर्यटकांची नेहमीपेक्षा तोबा गर्दी होती, कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हा पूल ३० वर्षे जुना असून पूर्वी याचा उपयोग पायी नदी ओलांडण्यासाठी केल्या जायचा, यावेळी १०० हून अधिक पर्यटक कुंडमळ्यावर असलेल्या पुलावर उभे राहून निसर्गाचा आनंद घेत होती, कुंडमळ्यावर असलेला हा पूल आधीच जीर्ण झाला होता त्यातचं मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल खचलाही होता. आज दुपारी अचानक एकाचवेळी अनेक पर्यटक या पुलावर आल्याने पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
२० ते २५ लोक वाहून गेले
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व एनडीआरएफचे बचाव पथक व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पूल तुटल्यानंतर या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोक वाहून गेले आहेत याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही परंतु स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांना दिलेल्या माहिती नुसार या दुर्घटनेत 20 ते २५ पर्यटक इंद्रायणी नदीत वाहून गेले असल्याची माहिती आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांकडूनही बचावकार्यात मदत केली जात आहे, आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मदत कार्य
कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून एनडीआरएफचे बचाव पथक स्थानिक पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने जे लोक तेथे अडकली आहेत त्यांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे. स्थानिक प्रशासनाने व पिंपरी चिंचवड पोलिसांच्यावतीने नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले गेले आहे. घटनास्थळी बचावकार्यासाठीची जागा पुरेशी नसल्याने नागरिकांनी गर्दी केल्यास अथवा जास्त वाहने जमल्यास बचाव कार्यास अडथळा ठरण्याची शकयता याठिकाणी आहे यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.